व्ही.पी.एस. हायस्कूलमध्ये पारंपरिक महाभोंडल्याचा उत्साहात जल्लोष
लोणावळा, संपादक : संजय पालवे
विद्या प्रसारिणी सभेच्या व्ही.पी.एस. हायस्कूल व द.पू. मेहता कनिष्ठ महाविद्यालयामध्ये शारदीय नवरात्रोत्सवानिमित्त महाभोंडल्याचे आयोजन करण्यात आले. दरवर्षीप्रमाणे यंदाही सांस्कृतिक विभागाच्या वतीने दोन सत्रांमध्ये कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
सकाळच्या सत्रात कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थिनी व शिक्षिकांसाठी तर दुपारच्या सत्रात हायस्कूलमधील विद्यार्थिनी व शिक्षिकांसाठी महाभोंडल्याचे आयोजन करण्यात आले. यावेळी गजाच्या मूर्तीचे पूजन करण्यात आले. प्रशालेच्या प्राचार्या श्रीमती प्रज्ञा शुक्ल, उपमुख्याध्यापक श्री. श्रीनिवास गजेंद्रगडकर, उपप्राचार्य श्री. आदिनाथ दहिफळे, पर्यवेक्षक श्री. अनिल खामकर, पर्यवेक्षिका श्रीमती अक्षता पाध्ये, ज्येष्ठ लिपिक श्री. कुंडलिक आंबेकर, सांस्कृतिक विभागप्रमुख श्री. वैभव सूर्यवंशी, शिक्षक प्रतिनिधी श्री. कल्याण चौगुले आणि शिक्षकेतर कर्मचारी प्रतिनिधी श्री. सिताराम घारे यांच्या हस्ते पूजन करण्यात आले.
विद्यालयाच्या मैदानावर गोलाकार रचना करून विद्यार्थिनींना भोंडल्याचा पारंपरिक खेळ खेळण्यासाठी व्यवस्था करण्यात आली होती. या आयोजनासाठी श्री. वैभव सूर्यवंशी, श्री. योगेश कोठावदे , श्री .सोमनाथ ढूमणे, श्री. संजय पालवे , श्रीमती वैशाली तारु, श्री . भीमराव राऊत, श्री. दिनेश परचंड, श्रीमती रेवती बोके, श्रीमती सरिता मिंढे आणि वीरेंद्र धुमाळ यांनी विशेष सहकार्य केले. तसेच चित्रकला विभागाच्या वतीने श्री. महेश चोणगे, श्री. विक्रम शिंदे आणि श्री. योगेश कोठावदे यांनी फलकावर गजाचे सुंदर चित्र रेखाटून कार्यक्रमाची शोभा वाढवली. शिक्षकांनी भोंडल्याची पारंपारिक गाणी गायली.
महाभोंडल्याच्या निमित्ताने विद्यालयातील विद्यार्थिनी पारंपरिक वेशभूषेत सहभागी झाल्या होत्या. गरबा संगीताच्या तालावर विद्यार्थिनींनी आकर्षक गरबा नृत्य सादर करून कार्यक्रमात उत्साह निर्माण केला. पारंपरिक संस्कृतीचे जतन आणि संवर्धन करण्याच्या दृष्टीने या उपक्रमाला विशेष महत्त्व होते. कार्यक्रमाच्या शेवटी सर्व विद्यार्थिनींना भोंडल्याचा पारंपरिक प्रसाद वाटप करण्यात आला.
नियामक मंडळ अध्यक्षा डॉ. मृणालिनी गरवारे, कार्यवाह डॉ. सतीश गवळी, सहकार्यवाह श्री. विजयजी भुरके आणि नियामक मंडळ सदस्य तथा शाळा समितीचे अध्यक्ष श्री. भगवानभाऊ आंबेकर यांनी शिक्षक, पालक, सेवक आणि विद्यार्थ्यांना शारदीय नवरात्रोत्सवानिमित्त शुभेच्छा दिल्या.
उपक्रमामुळे विद्यालयातील विद्यार्थिनींना पारंपरिक लोकसंस्कृतीचा आनंद घेता आला. उत्साहपूर्ण वातावरणात महाभोंडल्याचा कार्यक्रम संपन्न झाला.
कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी प्रशालेतील शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांचे मोलाचे सहकार्य लाभले. सेवक श्री मुकुंद जगताप आणि श्री.मयुर पवार यांनी साऊंड सिस्टिम व्यवस्था पाहिली.