एस.जी.गुप्ता विद्यालयात भोंडल्याचे आयोजन
लोणावळा, 01/10/2022
विद्या प्रसारिणी संस्थेच्या श्रीमती.शांतीदेवी गोपीचंद गुप्ता विद्यालय व कनिष्ट महाविद्यालय तसेच श्री विद्या बालक मंदिर भाजे येथे नवरात्री निमित्त भोंडल्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमासाठी विद्या प्रसारिणी सभेच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष डॉ.गो.व्य. शिंगरे आणि कार्यवाह डॉ. सतीश गवळी यांचे मार्गदर्शन आणि शुभेच्छा लाभल्या.
कार्यक्रमा निमित्त स्त्री शक्तीचा जागर, सन्मान केला जावा म्हणून कार्यक्रमासाठी विविध क्षेत्रातील यशस्वी महिलांना आमंत्रित करण्यात आले. वडगाव मावळ येथील प्रसिद्ध ऍडव्होकेट सुधा डिमळे ,भाजे गावच्या पोलीस पाटील उज्ज्वला अंबुरे प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या.
प्राचार्या वर्षा क्षिरसागर आणि बालक मंदिरच्या मुख्याध्यापिका स्वाती रगडे यांच्या संकल्पनेतून आणि सांस्कृतिक विभाग प्रमुख सुरेखा अहिरे ,श्रीमती खैरे यांच्या नियोजनातून सुंदर कार्यक्रम पार पडला. कार्यक्रमाचे सूत्र संचालन शाळेच्या इ. नववी आणि दहावी च्या विद्यार्थिनींनी केले.प्रमुख पाहुण्या ऍड. डीमळे यांनी सर्व विद्यार्थिनींना कायद्याचा स्वसंरक्षणासाठी योग्य वापर कसा करावा, दुरूपयोग कसा करू नये. विषयावर अनमोल मार्गदर्शन केले. पोलीस पाटील अंबुरे यांनी मुलींना अन्यायाविरुद्ध आवाज उठवणे, मोबाईल, दूरचित्रवाणीचा अतिवापर टाळणे याविषयावर मार्गदर्शन केले .
विद्यालयाच्या प्राचार्या क्षिरसागर व बालक मंदिरच्या मुख्याध्यापिका रगडे यांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन शिक्षक प्रतिनिधी जालिंदर बनकर यांनी मानले.अतिशय उत्साहात भोंडला साजरा करण्यात आला. विद्यार्थिनींनी फेर धरून पारंपारिक वेशभूषेत गरबा नृत्य केले. खिरापत वाटून कार्यक्रमाची सांगता झाली.