भंडाराडोंगर भक्तीगडावर कीर्तनसोहळा संपन्न

तळेगाव दाभाडे, (संपादक : संजय पालवे)
     श्री क्षेत्र भंडारा डोंगर भक्ती गडावर सुरू असलेल्या सप्ताहाची समाप्ती भक्ती भावाने संपन्न झाली. आठ दिवस चालू असलेल्या सप्ताहामध्ये विविध तीर्थक्षेत्रावरील महाराजांचे कीर्तन, भजन, पारायण, काकडा आणि त्यानंतर स्नेहभोजन असा नित्याचा क्रम चालू असतो.   
  सप्ताहासाठी श्री क्षेत्र भंडारा डोंगर परिसरातील गावांमधून नागरिक अन्नदानासाठी पुढे येऊन दररोज सप्ताहासाठी गडावर येणाऱ्या भक्तांना अन्नदान करतात.
     सलग पंचवीस वर्षे शनिशिंगणापूर येथील नागरिक भंडारा डोंगरगडावर जगद्गुरु श्री तुकाराम महाराज मंदिरामध्ये सप्ताहाचे आयोजन करत आहेत. सप्ताहाचे नियोजन शनिशिंगणापूर येथील भक्त श्री.रावसाहेब शेटे यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या पंचवीस वर्षांपासून आयोजन करत असून त्यांना त्यांचे सर्व सहकारी चांगल्या प्रकारे सहकार्य करतात.
     या वर्षीच्या सप्ताहाचे वैशिष्ट्य म्हणजे यावर्षी भक्तीसेवेला पंचवीस वर्षे पूर्ण होत आहे. त्यानिमित्ताने श्री.रावसाहेब शेटे व त्यांच्या सहकाऱ्यांनी कीर्तनाची सेवा करणारे महाराज व त्यांच्या सहकाऱ्यांना शनि महाराजांची प्रतिकृती देऊन सन्मानित केले.
     31 डिसेंबरला सुरू झालेल्या सप्ताहाची समाप्ती 7 जानेवारीला झाली. काल्याचे कीर्तन बाळकृष्ण महाराज यांचे होते. काल्याच्या कीर्तनाचे अन्नदान श्री.मोकाटे कुटुंबियांकडून करण्यात आले. आठवड्याभरामध्ये विविध महाराजांनी त्यांची सेवा केली, त्याचबरोबर विविध भक्तांनी अन्नदानाद्वारे आलेल्या भक्तांची सेवा केली तर अनेक भक्तांनी विविध कीर्तनांचा लाभ घेऊन आपले जीवन सार्थक केले.
      सप्ताह निमित्त शनिशिंगणापूर -घोडेगाव ठिकाणावरून आलेले भक्त श्री.महादेव शिरसाठ आणि इंदोरी येथील भक्त श्री.शिंदे सर यांनी माहिती दिली की, सप्ताहाच्या आठ दिवसांमध्ये भक्ताला आपल्या घराची आठवण येत नाही, याचे कारण म्हणजे या ठिकाणी असलेले चैतन्याचे वातावरण आणि  मिळणाऱ्या सुविधा यामुळे भक्त आठ दिवस गडावर भक्तीमध्ये रंगून जातात.
     गडावर सुरू असलेल्या श्री संत जगद्गुरु तुकाराम महाराज मंदिराच्या बांधकामाचे वर्णन शब्दांमध्ये होऊ शकत नाही, परंतु  बांधकामाचा विस्तार पाहता अतिशय भव्य असे मंदिर गडावरती उभा राहत आहे, हे पाहून भक्त सढळ हाताने त्यांना शक्य होईल तेवढी मदत करत आहेत.