लोणावळा शालेय कर्मचारी पतसंस्थेची वार्षिक सभा संपन्न
लोणावळा, संपादक: संजय पालवे,
लोणावळा शालेय कर्मचारी सहकारी पतसंस्था मर्यादित सभेची 46 वी वार्षिक सभा व्ही.पी.एस हायस्कूल व द.पू.मेहता कनिष्ठ महाविद्यालयाच्या 'प्रकाश हॉल' येथे संपन्न झाली.
दरवर्षी प्रमाणे याही वर्षी शालेय कर्मचारी सहकारी पतसंस्थेच्या सभेचे आयोजन करण्यात आले. सदर सभा पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष माननीय श्री.भगवानभाऊ आंबेकर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि पतसंस्थेचे अध्यक्ष श्री.विठ्ठल खेडकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. सभेसाठी अध्यक्ष श्री.विठ्ठल खेडकर, उपाध्यक्ष श्री. महेश चोणगे, चिटणीस श्री. प्र. सं.पाटील, समिती सदस्य श्री.श्रीनिवास गजेंद्रगडकर, श्री. रवी दंडगव्हालळ, श्री.आदिनाथ दहिफळे, श्री.सं. के. ठाकुर, श्री. म. ल. भोसले, श्रीमती. मं. प्र. ईकारी, श्रीमती. सा.च. आपटे संस्थेला नेहमी मोलाचे सहकार्य व मार्गदर्शन करणारे श्री. कुंडलिकभाऊ आंबेकर, लेखनिक श्री. निलेश ढाकोळ प्राचार्य उदय महिंद्रकर, पर्यवेक्षक विजय रसाळ आणि लोणावळा परिसरातील विविध शाळेतील सभासद उपस्थित होते.
सभेला सुरुवात सरस्वती पूजन, दिवंगत सभासदांच्या श्रद्धांजली आणि नवीन सभासदांच्या स्वागताने करण्यात आली. सभेने ठरवलेल्या कार्यक्रम पत्रिकेनुसार सभेचे काम सुरळीत संपन्न झाले. सभेच्या परंपरेनुसार वार्षिक अहवाल वाचन, नफा - तोटा ताळेबंद, जमा खर्चाचा हिशोब, हिशोब तपासणीचा अहवाल वाचन सादर करण्यात आले.
220 सभासदांच्या अडीअडचणीत मदतीचा हात देणारी आणि दोन- सव्वादोन कोटी भागभांडवल असणाऱ्या लाखो रुपयाच्या नफ्यात चालणारी आपली शालेय सहकारी पतसंस्था नेहमीच सभासदांचे हित सहकाराचे सर्व नियम सांभाळून करत असते, तसेच चालू वर्षासाठी सभासदांना 10% ने लाभांशाचे वाटप करण्यात येत असल्याचे अध्यक्षाकडून सांगण्यात आले.
सभेमध्ये सेवानिवृत्त सभासद, पदोन्नती मिळालेले सभासद, शासकीय पुरस्कार प्राप्त तसेच शैक्षणिक गुणवत्ता वाढ प्राप्त सभासदांचा सत्कार करण्यात आला. सभासदांच्या आलेल्या सूचनांवर चर्चा करून त्यांचे निरसन सर्व कार्यकारी मंडळांनी केले. अध्यक्षानी स्थानिक हिशोब तपासणीपदी श्री. बाळू पिंगट यांची निवड अवाजी मतदानानी केली.
सभेचा एकूनच आढावा सभासदांच्या मनोगतातून घेण्यात आला. सभेची सांगता श्री. आदिनाथ दहिफळे यांच्या आभार प्रदर्शनाने झाली. संस्थेच्या वतीने सभेस उपस्थित सभासदांसाठी हॉटेल 'चंद्रलोक' या ठिकाणी भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती.