भाजे हायस्कूल मध्ये शिक्षक दिन उत्साहात साजरा
लोणावळा, संपादक: संजय पालवे,
विद्या प्रसारिणी सभेच्या श्रीमती शांतीदेवी गोपीचंद गुप्ता विद्यालयात दरवर्षीप्रमाणे 5 सप्टेंबर रोजी शिक्षक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. संस्थेच्या शतक महोत्सवानिमित्त नियामक मंडळाच्या अध्यक्षा डॉ. मृणालिनी गरवारे, कार्यवाह डॉ. श्री.सतीश गवळी आणि सहकार्यवाह श्री.विजय भुरके यांच्या प्रेरणेने शिक्षक दिन मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
इयत्ता दहावीच्या व बारावीच्या सुमारे 50 विद्यार्थ्यांनी शिक्षकांची व सेवकांची भूमिका बजावली. इयत्ता पाचवी ते नववीच्या तसेच अकरावीच्या वर्गांचे अध्यापन करून संचालन विद्यार्थ्यांनी केले. इयत्ता दहावीतील विद्यार्थी प्रांशू नागर याने मुख्याध्यापकाची भूमिका बजावली तर आदित्य काळे या विद्यार्थ्याने पर्यवेक्षकाची भूमिका पार पाडली. प्रशालेचे प्राचार्य श्री.संतोष पवार आणि पर्यवेक्षक श्री. मकरंद गुर्जर यांच्या मार्गदर्शनाप्रमाणे कार्यक्रमाची आखणी करण्यात आली.
सांस्कृतिक विभाग प्रमुख श्री.रोहिदास डिकोळे, सौ.सुरेखा अहिरे, सौ.कविता गायकवाड यांनी शिक्षक दिन कार्यक्रमाचे नियोजन केले. कार्यक्रमातील सर्व सहभागी विद्यार्थ्यांना एक दिवस शिक्षक म्हणून काम करण्याची संधी मिळाल्याचा आनंद सर्वांच्या चेहऱ्यावर दिसत होता. सहभागी विद्यार्थ्यांना आणि शिक्षकांना पेन देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला.
डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस राष्ट्रीय शिक्षक दिन म्हणून प्रशालेत मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. त्यानिमित्त झालेल्या कार्यक्रमात सर्व सहभागी विद्यार्थी शिक्षकांनी व प्रशालेतील शिक्षकांनी आपल्या मनोगतातून डॉक्टर राधाकृष्णन यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त केली. तसेच शिक्षक होणे किती अवघड असते हे विद्यार्थ्यांनी बोलून दाखवले. विद्यार्थ्यांच्या पाठ निरीक्षणाची जबाबदारी श्री.राजेंद्र होले, श्री.गहिनीनाथ बारगजे आणि श्री.मनोहर भोसले यांनी पाहिली. प्रशालेचे पर्यवेक्षक श्री.मकरंद गुर्जर यांनी आपल्या मनोगतातून शिक्षकाच्या अंगी कोणते गुण असावे लागतात व शिक्षकांना संस्कारक्षम पिढी बनविण्यासाठी कष्ट घ्यावे लागतात हे सांगितले, तसेच गुरुकुल पद्धतीतील शिक्षणावर आधारित एक कथा विद्यार्थ्यांना सांगितली आणि सहभागी विद्यार्थ्यांचे कौतुक केले.
प्रशालेचे प्राचार्य श्री.संतोष पवार यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणातून डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन यांची महती विद्यार्थ्यांना सांगितली आणि विद्यार्थ्यांना भावी आयुष्यात शिक्षक होण्यासाठी शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दहावीच्या विद्यार्थिनी कु.आर्या केदारी आणि कु.कार्तिकी गायकवाड यांनी केले. कलाशिक्षक श्री.धुळाजी देवकाते आणि श्री.विजय कवडे यांनी सुंदर फलक लेखन केले.
शिक्षक प्रतिनिधी श्री.देवीदास खेडकर यांनी आभार प्रदर्शन केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व शिक्षक व शिक्षकेतर सेवक यांनी परिश्रम घेतले.