पुणे जिल्हास्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्काराचे वितरण
लोणावळा, संपादक: संजय पालवे
जागतिक शिक्षक दिनानिमित्त गणेश क्रीडा मंच पुणे या ठिकाणी झालेल्या गुणवंत शिक्षक सन्मान सोहळा कार्यक्रमामध्ये मावळ तालुक्यामधून दोन शिक्षकांची निवड करण्यात आली. त्यामध्ये व्ही.पी.एस हायस्कूल लोणावळा मधील श्री. कुंडलिक आंबेकर (वरिष्ठ लिपिक) आणि पवना विद्या मंदिर विद्यालयातील श्री.भारत काळे (शिक्षक)यांना कार्यक्रमांमध्ये सन्मानित करण्यात आले.
त्याचबरोबर महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेत परिषद तर्फे झालेल्या राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक सोहळ्यामध्ये व्ही.पी.एस हायस्कूलमधील श्री.श्रीनिवास गजेंद्रगडकर यांना सन्मानित करण्यात आले.
विद्या प्रसारिणी सभेच्या शतक महोत्सवी वर्षानिमित्त घेतले जाणारे विविध कार्यक्रम आणि गुरुजनांना मिळालेल्या सन्मान सोहळ्यामध्ये हा एक क्षण महत्वाचा मानला जातो. मिळालेल्या पुरस्काराबद्दल नियामक मंडळाच्या अध्यक्षा डॉ.सौ. मृणालिनी गरवारे, कार्यवाहक डॉ.श्री.सतीश गवळी, सकार्यवाह श्री.विजय भुरके, नियामक मंडळ सदस्य आणि शाळा समिती अध्यक्ष श्री.भगवानभाऊ आंबेकर आणि नियामक मंडळ सदस्य तसेच बी.सी.एस महाविद्यालयाचे शाळा समिती अध्यक्ष ॲड.श्री. संदीप अगरवाल यांनी कौतुक केले.
शिक्षक नेहमीच ज्ञानदानाचे पवित्र कार्य करत असतात. अशा प्रकारे सन्मान सोहळा आयोजित करून त्यांच्या कार्याची पावती शिक्षकांना खऱ्या अर्थाने मिळते. शिक्षक गुणवंत सोहळ्यासाठी श्री.शरद तांदळे (उद्योजक), श्री.जयंत आसगावकर (शिक्षक आमदार पुणे विभाग), श्री. ज्ञानेश्वर म्हात्रे (शिक्षक आमदार कोकण विभाग), जिल्हा परिषदेचे पदाधिकारी आणि मुख्याध्यापक संघाचे पदाधिकारी उपस्थित होते.
पुरस्कार वितरण प्रसंगी उपस्थितांच्या मनोगता मधून शिक्षकांचा व शिक्षकेतर कर्मचारी यांच्या कार्याप्रती गौरव उद्गार काढण्यात आले. त्यांनी शिक्षकांच्या वेदना, त्यांच्या अडचणी तसेच शिक्षकांना दिल्या जाणाऱ्या शालाबाह्य कामाबद्दल खंत व्यक्त केली. अशा प्रकारचे कामे कसे टाळले जातील या प्रती प्रयत्न करू अशी ग्वाही दिली.