'अंबर' तर्फे मान्यवरांचा सन्मान सोहळा संपन्न
लोणावळा, संपादक : संजय पालवे
लोणावळा येथील सुप्रसिद्ध हॉटेल चंद्रलोक मध्ये साप्ताहिक अंबरच्या 34 व्या वर्धापन दिनानिमित्त विविध क्षेत्रांमध्ये उत्कृष्ट कार्य करणाऱ्या मान्यवरांचा सन्मान सोहळा पार पडला. सोहळ्याचे अध्यक्षस्थान जेष्ठ पत्रकार डॉ.उदय निरगुडकर यांनी भूषवले.
दरवर्षी प्रमाणे याही वर्षी सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींचा सन्मान सोहळा साप्ताहिक वृत्तपत्र ' अंबर ' यांच्यातर्फे करण्यात आला. या वर्षीचा सन्मान सोहळा लोणावळा यथील हॉटेल चंद्रलोक मध्ये पार पडला. कार्यक्रमामध्ये श्री.अरविंद कुलकर्णी यांना 'जीवनगौरव पुरस्काराने' सन्मानित करण्यात आले. विद्या प्रसारिणी सभेच्या नियामक मंडळाचे सदस्य आणि शाळा समिती अध्यक्ष श्री.भगवानभाऊ आंबेकर यांना 'उत्कृष्ट प्रशासक' पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
मावळ तालुक्यामधील नामांकित हायस्कूल म्हणून व्ही.पी.एस हायस्कूल व द.पू.मेहता कनिष्ठ महाविद्यालय विद्यालयाचे नाव आहे. याच विद्यालयांमध्ये भगवानभाऊ यांनी छत्तीस वर्षे सेवा केली, सेवा करत असताना भगवानभाऊ यांनी गोरगरीब विद्यार्थ्यांना मदत करणे, समाजातील दानशूर व्यक्तींकडून विद्यार्थ्यांची फी भरण्यास मदत घेणे, विद्यार्थ्यांच्या अडचणी सोडवण्याचे महान कार्य केले. या कार्याची दखल घेऊन सभेने भाऊंना नियामक मंडळामध्ये सामील करून घेऊन शाळा समिती अध्यक्षाची जबाबदारी दिली. आणि आज भगवानभाऊ यांच्या अध्यक्षतेखाली प्रशालेचा कारभार सुरळीतपणे चालू असून शाळेचा चेहरा मोहरा बदलला आहे. अशा महान कार्यासाठी साप्ताहिक 'अंबर ' ने भगवानभाऊ यांना सन्मानित केले. भगवानभाऊ यांनी त्यांच्या कार्यामध्ये खंबीरपणे साथ देणाऱ्या त्यांच्या अर्धांगिनी संजीवनीताई यांच्या समवेत पुरस्काराचा स्वीकार केला.
श्री.भगवानभाऊ आंबेकर यांना मिळालेला पुरस्कार त्यांनी विद्या प्रसारिणी सभेच्या नियामक मंडळाचे माजी अध्यक्ष कै.डॉ. गोवर्धन शिंगरे, संस्थेचे अध्यक्ष डॉ.वा.मा.औटी आणि नियामक मंडळाच्या अध्यक्षा डॉ. मृणालिणी गरवारे यांना समर्पित केला. समर्पणामागील भावना व्यक्त करताना भगवानभाऊ म्हणाले की, सभेने कार्य करण्याची संधी दिली आणि कार्य करत असताना समाजसेवा करण्याची संधी उपलब्ध झाली आणि यामुळेच आजचा सन्मान सोहळा पाहायला मिळत आहे.
कार्यक्रमासाठी साप्ताहिक अंबरचे संपादक श्री. सुरेश साखवळकर, श्री.प्रशांत पुराणिक, सहसंपादक श्री.अतुल पवार, श्री.नंदकुमार वाळंज, उद्योगपती व ज्येष्ठ समाजसेवक श्री. विनय विध्वंस, माजी सभापती शिक्षण मंडळ श्री.देविदास कडू त्याचबरोबर माजी नगरसेवक उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. प्रशांत पुराणिक तर आभार श्री.अतुल पवार यांनी मानले.