श्रीमती क्षमा प्रमोद देशपांडे यांच्या सेवापूर्ती समारंभाचे आयोजन

लोणावळा, संपादक: संजय पालवे 
     विद्या प्रसारिणी सभेच्या व्ही.पी.एस हायस्कूल व द.पू.मेहता कनिष्ठ महाविद्यालयामध्ये 'श्रीमती क्षमा प्रमोद देशपांडे' यांचा सेवापूर्ती कार्यक्रम दिमाखात पार पडला.
   कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान नियामक मंडळ सदस्य तथा शाला समिती अध्यक्ष श्री.भगवानभाऊ आंबेकर यांनी भुषवले. प्रसंगी मंचावर शाला समिती सदस्य श्री.धीरूभाई कल्याणजी, श्री.राजेशजी मेहता, प्राचार्य श्री. उदय महिंद्रकर, उपमुख्याध्यापक श्री.सुहास विसाळ, पर्यवेक्षक श्री.विजय रसाळ, श्री.श्रीनिवास गजेंद्रगडकर, शिक्षक प्रतिनिधी श्रीमती ज्योती डामसे, शिक्षकेतर प्रतिनिधी श्रीमती संजीवनी आंबेकर, वरिष्ठ लिपिक श्री. कुंडलिक आंबेकर उत्सव मूर्ती पर्यवेक्षिका श्रीमती क्षमा देशपांडे, श्री.प्रमोद देशपांडे आणि नातेवाईक उपस्थित होते.
   श्रीमती क्षमा देशपांडे मॅडम ह्या 31 डिसेंबर रोजी आपल्या 31 वर्ष आणि 4 महिन्याच्या प्रदीर्घ अध्यापनाच्या कार्यानंतर पर्यवेक्षिका पदावरून सेवानिवृत्त होत आहेत. 1993 मध्ये श्रीमती क्षमा देशपांडे मॅडम यांनी मावळ तालुक्यातील मळवली येथील नवीनच सुरू झालेल्या सभेच्या विद्या प्रशालेमधून अध्यापन कार्यास सुरुवात केली. आपल्या प्रदीर्घ सेवेमध्ये त्यांनी विद्या प्रसारिणी सभेच्या विविध विद्याशाखेंमध्ये अध्यापनाचे कार्य केले. विद्या प्रशाला मळवली, भारत इंग्लिश स्कूल शिवाजीनगर पुणे आणि व्हीपीएस हायस्कूल लोणावळा या ठिकाणी त्यांनी आपली सेवा केली.
   श्रीमती क्षमा देशपांडे मॅडम यांचा अध्यापनाचा मुख्य विषय इंग्रजी आहे. अध्यापन करत असताना संगीत, भजन त्याचबरोबर त्यांनी कीर्तनाची पदवी संपादन केली. श्रीमती देशपांडे मॅडम यांनी आपले शिक्षण खूप कष्टाने पूर्ण केले. शिक्षण पूर्ण करत असताना त्यांना माहेर आणि सासर दोन्ही कुटुंबीयांची मोलाची साथ मिळाली. लहानपणापासूनच त्यांच्या स्वभावामध्ये जिद्द आणि चिकाटी पहावयास मिळते. अध्यापना बरोबरच त्यांनी  विद्यार्थ्यांच्या शिस्तीकडे विशेष लक्ष दिले.
     शाळेमधील विद्यार्थिनींना येणाऱ्या अडचणी ओळखून त्यांनी विद्यार्थिनींसाठी व्याख्याने आयोजित केली. त्याचबरोबर विद्यार्थिनींमध्ये आत्मसंरक्षण करण्याची प्रवृत्ती निर्माण करण्यासाठी मॅडमने हिरीरीने पुढाकार घेतला. कित्येक वर्ष मॅडम सांस्कृतिक विभाग प्रमुख म्हणून राहिल्या आहेत. त्याचबरोबर समाजामधील विविध शैक्षणिक, सामाजिक संस्थांनी मॅडम यांच्या कार्याचा गुणगौरव करत विविध पुरस्काराने सन्मानित केलेले आहे.
     विद्या प्रसारिणी सभेच्या अध्यक्षा डॉ. मृणालिनी गरवारे, कार्यवाह डॉ.सतीश गवळी सहकार्यवाह श्री.विजयजी भुरके यांनी श्रीमती देशपांडे मॅडम यांना पत्राद्वारे शुभेच्छा दिल्या. यानिमित्ताने देशपांडे कुटुंबीयाने विद्या प्रसारिणी सभेला एक लाख रुपयांची देणगी बहाल केली.
     कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री.सोमनाथ ढुमणे यांनी आपल्या अदाकारी शैलीत केले. प्रास्ताविक उपमुख्याध्यापक श्री.सुहास विसाळ यांनी केले स्वागत गीत आणि ईशस्तवन श्री. धनंजय काळे आणि चि.गौरव गोणते यांनी गायले तर आभार पर्यवेक्षक श्री.गजेंद्रगडकर यांनी मांडले. श्रीमती देशपांडे मॅडम यांच्या छायाचित्राची पीपीटी श्री.गायकवाड सर यांनी तयार केली. तसेच कार्यक्रम यशस्वी पार पाडण्यासाठी शिक्षक आणि सेवक यांनी  सहकार्य केले.

Popular posts from this blog

व्ही.पी.एस. हायस्कूलमध्ये पारंपरिक महाभोंडल्याचा उत्साहात जल्लोष

व्ही.पी.एस मध्ये दीप अमावस्या साजरी

व्ही.पी.एस मध्ये ८०वा स्वातंत्र दिन साजरा