संजीवनीताई भगवानराव आंबेकर यांचा सेवापूर्ती कार्यक्रम साजरा
लोणावळा संपादक:संजय पालवे
28 वर्षाच्या प्रदीर्घ सेवेनंतर शासकीय नियमानुसार संजीवनीताई ह्या 31मे 2025 रोजी सेवानिवृत्त होत आहेत. यानिमित्ताने प्रशालेने संजीवनीताई यांचा सेवापूर्ती कार्यक्रम अतिशय दिमाखात साजरा केला.
विद्या प्रसारिणी सभेच्या व्ही.पी.एस हायस्कूल व द.पू.मेहता कनिष्ठ महाविद्यालयातील प्रकाश हॉल मध्ये श्रीमती संजीवनीताई भगवानराव आंबेकर यांचा सेवापूर्ती कार्यक्रम संपन्न झाला.
कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून विद्या प्रसारिणी सभेच्या नियामक मंडळाच्या अध्यक्षा डॉ.मृणालिनीताई गरवारे होत्या. त्याचबरोबर कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून ह.भ.प बाळासाहेब काशीद (अध्यक्ष भंडारा डोंगर ट्रस्ट ), कार्यवाह डॉ.सतीश गवळी, नियामक मंडळ सदस्य तथा शाळा समिती अध्यक्ष श्री.भगवानभाऊ आंबेकर, नियामक मंडळ सदस्य ॲड.संदीप अगरवाल, श्री.नितीन गरवारे, श्री.प्रमोद कुदळे, श्रीमती साधना कुदळे, शाळा समिती सदस्य श्री.धीरूभाई कल्याणजी, श्री.राजेशजी मेहता, ह.भ.प. निवृत्ती महाराज जगताप, श्री.बबनराव आंबेकर (अध्यक्ष तंटामुक्ती समिती देवले) उपस्थित होते.
प्रशालेचे प्राचार्य श्री.उदय महिंद्रकर, उपमुख्याध्यापक श्री.सुहास विसाळ, पर्यवेक्षक श्री.विजय रसाळ, श्री.श्रीनिवास गजेंद्रगडकर, उपप्राचार्य श्री.आदिनाथ दहिफळे, शिक्षक प्रतिनिधी श्रीमती ज्योती डामसे, मुख्य लिपिक श्री. कुंडलिक आंबेकर, विविध विद्याशाखेचे मुख्याध्यापक, शिक्षक, मित्रपरिवार आणि नातेवाईक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
श्रीमती संजीवनीताई आंबेकर यांनी 28 वर्ष ग्रंथपाल म्हणून कार्य केले. त्याचबरोबर शाळेमध्ये होणारे विविध सांस्कृतिक कार्यक्रम आणि स्पर्धा यामध्ये देखील त्यांनी हिरीरीने सहभाग घेतला. ग्रंथपाल म्हणून कार्य करत असतांना ग्रंथालयातील पुस्तकांचा फायदा विद्यार्थी, शिक्षक आणि सेवक यांना कसा होईल याचे छान नियोजन त्यांनी केले होते.
विद्यार्थ्यांनी ग्रंथालयामध्ये बसून जास्तीत जास्त पुस्तकाचे वाचन करावे हा त्यांचा ध्यास होता. त्यासाठी त्यांनी ग्रंथालय पुस्तकांनी सुसज्ज ठेवले होते. त्यांच्या प्रयत्नानेच मावळ तालुक्यामधील सर्वात मोठे एकोणीस हजाराहून जास्त पुस्तके असणारे स्वामी विवेकानंद ग्रंथालय व्ही.पी.एस च्या प्रांगणात आहे.
उपस्थितांपैकी डॉ.मृणालिनी गरवारे, श्री.बाळासाहेब काशीद, डॉ.सतीश गवळी, श्री.भगवानभाऊ आंबेकर, ॲड.संदीप अगरवाल, श्री.उदय महिंद्रकर, श्री.बबनराव आंबेकर, श्री.निवृत्ती महाराज जगताप, श्रीमती वैजयंती जगताप, श्री.शुभांगी कडू यांनी आपली मनोगते सादर केली.मनोगतामधून संजीवनीताई यांच्या कार्याचे तसेच त्यांनी विद्यार्थ्यांसाठी आणि आपल्या कुटुंबासाठी केलेल्या परिश्रमाचे वर्णन सर्वांनी केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक पर्यवेक्षक श्री. विजय रसाळ यांनी केले. प्रमुख पाहुण्यांचा परिचय आणि सूत्रसंचालन श्री.सोमनाथ ढुमणे यांनी केले. स्वागत गीत श्री.धनंजय काळे यांनी आपल्या सुमधुर आवाजामध्ये सादर केले.
उपस्थित पाहुण्यांचे स्वागत स्काऊट गाईड पथकाने आणि ढोल पथकाने करण्यात आले. त्यासाठी श्री.संजय पालवे आणि श्री.श्रीकांत म्हसकर यांनी त्यांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमासाठी उपस्थित मान्यवरांचे आभार श्री.आदिनाथ दहिफळे यांनी मानले.
कार्यक्रमाचे नियोजन श्री.कुंडलिक आंबेकर, श्री.योगेश कोठावदे, श्री.महेश चोणगे, शिक्षक आणि सेवक वर्ग यांनी केले.