शंभराव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या निमंत्रणासाठी तिसरे नांदी संमेलन उत्साहात


लोणावळा, संपादक : संजय पालवे
      शंभरावे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन, पुणे-२०२७ याच्या निमंत्रणासाठी महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे, समर्थ युवा फाउंडेशन, मराठी भाषा विभाग आणि मनशक्ती प्रयोगकेंद्र, लोणावळा यांच्या संयुक्त विद्यमाने ‘तिसरे नांदी संमेलन – साहित्य, विज्ञान, कला व बालकुमार साहित्य संमेलन’ मनशक्ती प्रयोगकेंद्र, लोणावळा येथे गुरुवार, दिनांक ३ सप्टेंबर २०२६ रोजी उत्साहात आयोजित करण्यात आले.
    संमेलनासाठी व्ही.पी.एस. हायस्कूल, लोणावळा येथील इयत्ता आठवी ‘अ’, ‘ब’ तसेच नववी ‘अ’, ‘ब’ या वर्गांतील एकूण ३० विद्यार्थी आणि शिक्षक श्री. शिवकुमार दहिफळे सहभागी झाले होते. तसेच लोणावळा व परिसरातील विविध शाळांमधील विद्यार्थीही या संमेलनात मोठ्या संख्येने सहभागी झाले. संमेलनाचे अध्यक्ष म्हणून साहित्य अकादमी पुरस्कारप्राप्त बालसाहित्यकार श्री. राजीव तांबे उपस्थित होते. कार्यक्रमाचे उद्घाटक श्री. योगेश सोमण हे मराठी रंगभूमी व चित्रपट क्षेत्रातील प्रसिद्ध अभिनेते, लेखक, दिग्दर्शक आणि वक्ते आहेत. अभिनयासोबतच लेखन आणि सामाजिक विषयांवरील भाष्य यासाठीही ते परिचित आहेत. दृश्यम चित्रपटातील पोलीस निरीक्षक विनायक सावंत आणि अभंग तुकाराममधील संत तुकाराम महाराज या त्यांच्या उल्लेखनीय भूमिका आहेत.
     स्वागताध्यक्ष श्री. प्रमोदभाई शिंदे, विश्वस्त, मनशक्ती प्रयोगकेंद्र, लोणावळा तसेच श्री. प्रसाद मिरासदार, स्थानिक कार्यवाह, महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे हे उपस्थित होते. श्री. प्रसाद मिरासदार हे मराठी साहित्यातील लेखक, कथाकार आणि विनोदी साहित्यिक म्हणून परिचित आहेत. त्यांच्या लेखनातून विनोद, ग्रामीण जीवन, माणसांचे स्वभाव तसेच दैनंदिन जीवनातील गंमती-जमती यांचे सुंदर चित्रण आढळते.
‘रेषांची भाषा’ या कार्यक्रमात प्रसिद्ध व्यंगचित्रकार, चित्रकार व ग्राफिक डिझायनर श्री. चारुहास पंडित यांनी आपल्या व्यंगचित्रांच्या माध्यमातून विविध भावभावनांचे सुंदर दर्शन घडवले. ‘चिंटू’ या लोकप्रिय मराठी व्यंगचित्र मालिकेचे ते सहनिर्माते आहेत.
     ‘विज्ञान गप्पा-गप्पी’ या कार्यक्रमात श्री. राजीव तांबे यांनी मनोरंजक व हास्यपूर्ण विज्ञानकथा सांगून विद्यार्थ्यांचे मनोरंजन केले. बालसाहित्याच्या माध्यमातून मुलांमध्ये कुतूहल व वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण करण्याचा सुंदर प्रयत्न या कार्यक्रमातून करण्यात आला.
यानंतर स्वरकुल निर्मित अभिजात वाचन, ‘संस्कृतीचा द्विपात्री संगीत-नाट्य आविष्कार – अक्षर गाणी’ याचे अत्यंत सुंदर सादरीकरण करण्यात आले. यामध्ये प्रमुख कलाकार श्री. त्यागराज खाडिलकर आणि दीपिका जोग यांनी उत्कृष्ट भूमिका साकारल्या. या सादरीकरणातून विद्यार्थ्यांना स्मार्टफोनच्या अतिवापराबाबत सावध राहण्याचा आणि त्याचा मर्यादित वापर करण्याचा संदेश देण्यात आला.
      कार्यक्रमाच्या शेवटी विद्यार्थ्यांच्या स्वलिखित निवडक कवितांचे वाचन करण्यात आले. यामध्ये आपल्या प्रशालेतील इयत्ता नववी ‘अ’मधील कु. रिठे सृष्टी सखाराम हिने ‘मैत्री’ या कवितेचे सुंदर वाचन केले. तसेच इयत्ता नववी ‘ब’मधील कु. पुनम गणेश गलधर हिने ‘बाबा’ या कवितेचे वचन केले.
      मान्यवरांनी दोघींचे कौतुक करून त्यांचा सन्मान केला. या संमेलनात लेखक, कवी आणि बालसाहित्यकार यांनी विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण व्हावी, पुस्तकांचा संग्रह करावा, ग्रंथालयाचा वापर करावा, मराठी साहित्य समृद्ध व्हावे तसेच स्मार्टफोनच्या अतिवापरापासून स्वतःला दूर ठेवावे, असा अनमोल संदेश दिला.
संमेलनातील सर्व कार्यक्रम अत्यंत दर्जेदार व उत्कृष्ट होते. विद्यार्थ्यांना हे सर्व कार्यक्रम फार आवडले. दिवसभर विद्यार्थ्यांनी विविध कार्यक्रमांचा मनमुराद आनंद लुटला. 
     कार्यक्रमासाठी प्रशालेच्या माननीय मुख्याध्यापिका सौ. प्रज्ञा शुक्ल, उपमुख्याध्यापक श्री. श्रीनिवास गजेंद्र गडकर, पर्यवेक्षक श्री. अनिल खामकर पर्यवेक्षिका श्रीमती अक्षता पाध्ये यांनी श्री शिवकुमार दहिफळे आणि श्री. योगेश कोठावदे यांचे अभिनंदन केले.

Popular posts from this blog

व्ही.पी.एस. हायस्कूलमध्ये पारंपरिक महाभोंडल्याचा उत्साहात जल्लोष

व्ही.पी.एस मध्ये दीप अमावस्या साजरी

व्ही.पी.एस मध्ये ८०वा स्वातंत्र दिन साजरा